विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सिनेमातील एका गाण्यावरुन वाद सुरु आहे. तरी विकीचा शंभूराजांच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. या सिनेमानंतर विकी आणखी एका महापुरुषाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'महावतार' सिनेमात तो भगवान परशुरामांची (Bhagwan Parshuram) भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या लेखकाने या संदर्भात माहिती दिली आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित 'महावतार' मध्ये विकी कौशल चिरंजीवी परशुराम यांच्या भूमिकेत आहे. नीरेन भट्ट सिनेमाचे लेखक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार नीरेन भट्ट म्हणाले, "महावतार मध्ये भगवान परशुरामाची कहाणी आहे जे भगवान विष्णुचा सहावा अवतार होते. यामध्ये भागवत पुराण आणि ११ इतर धर्मग्रथांमधून संदर्भ घेतला आहे. ग्रंथालयांमध्ये अनेक प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत पण लोक ते वाचत नाहीत. पूजेसाठीच त्यांचा उपयोग केला जातो."
ते पुढे म्हणाले, "पौराणिक कथांवर सिनेमा लिहिताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. कशातही चूक करुन चालत नाही. मी यासाठी भगवान परशुराम यांच्यावर प्राचीन नाटक आणि ११ उपन्यास वाचले."
विकी कौशलचा 'महावतार' सिनेमा पुढील वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. सिनेमातील विकीचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच आऊट झाला. मॅडॉक फिल्म्सच सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर लेखक नीरेन भट्ट यांनीच 'स्त्री २'चंही लेखन केलं होतं.