प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा आहे. संपूर्ण जगभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत गंगास्नान करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशलहीप्रयागराजला पोहोचला आहे. 'छावा' सिनेमामुळे चर्चेत असलेला विकी कौशल सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच महाकुंभमेळ्यात सहभागी झाला आहे.
विकी कौशलचा प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुंभमेळ्यात गेल्यानंतर विकी कौशलने मीडियाशी संवाद साधला. तो म्हणाला, "मला खूप आनंद होत आहे. किती दिवसांपासून मी इथे येण्याची वाट पाहत होतो. आता इथे आल्यावर मी भाग्यवान असल्यासारखं मला वाटत आहे".
'छावा' सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना पाहायला मिळणार आहे. याशिवाय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांचीही 'छावा' सिनेमात वर्णी लागली आहे. अभिनेत्री नीलकांती पाटेकर सिनेमात धाराऊची भूमिका साकारताना दिसणार आहेत. जगभरातील तमाम शिवप्रेमींना 'छावा' सिनेमाची उत्सुकता आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.