प्रसिद्ध भारतीयनाटककार आणि प्रख्यात दिग्दर्शक रतन थियम यांचं आज निधन झालं. बुधवारी (२३ जुलै) मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास रतन यांना इंफाळ येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीयनाटकांच्या इतिहासात रतन थियम यांनी विविध नाटकं दिग्दर्शित करुन खऱ्या अर्थाने एक इतिहास घडवला. रतन यांच्या निधनामुळे रंगभूमी गाजवणारा एक हिरा हरपला, अशी भावना कलाकारांच्या मनात आहे
रतन थियम यांची कारकीर्द
प्राचीन भारतीय रंगभूमीच्या इतिहासाचा वारसा रतन थियम यांनी पुढे चालवला. त्यांनी फक्त नाटकं लिहिली नाहीत तर नाटकांवर विचारमंथनही घडवून आणलं. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD) विविध नाटकं दिग्दर्शित केली. २०१३ ते २०१७ या काळात त्यांनी NSD च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. रतन यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांना १९८७ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय १९८९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
रतन थियम यांची नाटकं
रतना थियम यांनी NSD च्या त्यांच्या कारकीर्दीत विविध नाटकं दिग्दर्शित केली. रतन थियम यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं आजही अभ्यासली जातात. रतन थियम यांनी दिग्दर्शित केलेली 'अंधायुग', 'चक्रव्यूह', 'कर्णभारम', 'ऋतूसंहारम', 'लेंगशोनी' ही नाटकं खूप गाजली. रतन थियम यांच्या निधनाने अनेक कलाकारांनी आणि नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करणारा दिग्गज नाटककार हरपल्याची भावना, सर्वांच्या मनात आहे.