Join us

अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:16 IST

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची एक मुलाखत सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्यामध्ये नानांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल म्हणणं मांडलंय

नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारे लोकप्रिय अभिनेते. काही वर्षांपूर्वी नाना यांनी 'काला' सिनेमात रजनीकांतसोबत काम करुन साऊथ इंडस्ट्रीत सुद्धा त्यांच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला. नाना यांच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचं नाव 'वनवास'. अनिल शर्मा दिग्दर्शित आगामी 'वनवास' सिनेमात नाना पाटेकर अनेक महिन्यांनी बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने नाना आणि अनिल कपूर यांची एक मुलाखत व्हायरल झालीय.  

अभिनय क्षेत्रातून निवृत्तीबद्दल नाना काय म्हणाले?

 'वनवास' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या मुलाखतीचा विशेष व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झालाय. या मुलाखतीत अनिल कपूर नाना पाटेकर यांना म्हणतात की, "सिनेमातून रिटायरमेंट घेण्याची इच्छा आहे का?" त्यावर नाना पाटेकर म्हणतात, "मी रिटायर कसा होईल? आपल्या आसपास इतकं प्रदुषण आहे, इतकी घुसमट आहे, इतक्या घटना घडत आहेत. त्यामुळे अभिनय करुन मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं."

नाना पाटेकर पुढे म्हणाले, "मी माझ्या भविष्याकडे थोडा वेगळ्या दृष्टीकोनातून बघत आहे. जर माझ्याकडे काम नसेल तर मी कसा जगेन? जर माझ्याकडे काम नसेल तर मी मरेन किंवा वेडा होईल किंवा कोणालातरी मारेल. अभिनय सोडल्यास काय होईल हे मला माहित नाही. अभिनय आणि काम करत राहाणं हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानसिक समाधानासाठी हे महत्वाचं आहे." नाना पाटेकर यांचा आगामी 'वनवास' सिनेमा २० डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :नाना पाटेकरअनिल कपूरबॉलिवूड