Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखच्या मैत्रीचा किस्सा सांगताना ऋतुराज सिंह म्हणाले होते, "माझ्यावर संकट आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 17:36 IST

शाहरुख खानसोबतचे जुने फोटोही ऋतुराज यांनी पोस्ट केले होते.

टीव्ही अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh)यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या गाजत असलेल्या 'अनुपमा' मालिकेत ते दिसले. मालिकेतील सहकलाकारांनीही त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंह हे स्वादुपिंडाच्या आजारानेही त्रस्त होते. कागही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. मात्र त्यांना परत अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांचं हृदय बंद पडलं. खूप कमी जणांना माहित असेल की ऋतुराज सिंह हे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) घनिष्ठ मित्र होते. 

शाहरुख खान-ऋतुराज सिंह यांच्या मैत्रीचा किस्सा!

ऋतुराज सिंह दिल्लीत बैरी जॉन थिएटर ग्रुपमध्ये ११ वर्ष होते. शाहरुख त्यानंतर पाच वर्षांनी या ग्रुपमध्ये आला होता. दोघंही बैरी जॉन अॅक्टिंग ग्रुपचा भाग होते. त्या दिवसांबद्दल ऋतुराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "शाहरुख नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासाठी आतुर असायचा. जेव्हा तो आम्हाला जॉईन झाला तेव्हा तो एका लहान मुलासारखा होता. जितकं शक्य आहे तो तितकं शिकण्याचा प्रयत्न करायचा. तो खूपच हुशार होता."

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ऋतुराज म्हणाले होते की, "आम्ही दोघं चड्डी-बड्डी यार होतो. एकमेकांचे कपडेही आम्ही घातले आहेत. शाहरुखच्याच सांगण्यावरुन मी दिल्ली सोडून मुंबईत आलो आणि फिल्म-टेलिव्हिजनचा भाग झालो."

थिएटरनंतर शाहरुख खान स्टार झाला, बॉलिवूडचा किंग झाला. ऋतुराज तेव्हा स्ट्रगलच करत होते. मात्र त्यांना कधीच शाहरुखच्या यशाची इर्षा वाटली नाही. ऋतुराज नेहमी सांगायचे की जर कधी त्यांना कामाची गरज लागली तर शाहरुख पहिला व्यक्ती असेल जो त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल.

दरम्यान ऋतुराज सिंह यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वरुण धवन, कुणाल खेमू, अर्शद वारसीसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :शाहरुख खानटिव्ही कलाकारमृत्यूनाटकबॉलिवूड