अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक आयटम नंबर केले आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' सिनेमातील 'कावाला' या आयटम साँगनंतर तिचं 'स्त्री २' मधलं 'आज की रात' गाणंही गाजलं. दोन्ही गाण्यांतून तमन्नाने तिचा जलवा दाखवला. तमन्नाला या दोन्ही आयटम साँग्सने कमालीची प्रसिद्धी आणि पैसे मिळवून दिले. आता तमन्नाचं अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'रेड २' (Raid 2) मध्येही आयटम साँग असल्याचं समोर आलं आहे.
सोशल मीडियावरतमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती आयव्हरी रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. स्टायलिश बोल्ड गोल्डन ब्लाऊज आणि क्रीम रंगाचा लेहेंगा यात ती कमालीची हॉट दिसत आहे. गोल्डन लांब कानातले आणि मोकळे केस फ्लॉन्ट करत ती डान्स स्टेप्स दाखवत आहे. गाण्याच्या सेटवरील हा व्हिडिओ आहे ज्यात ती ठुमके लावताना दिसत आहे. तिचे सिग्नेचर स्टेप्स दाखवत तिने माहोल बनवला आहे. तमन्नाच्या याही गाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या गाण्यात तिच्यासोबत अजय किंवा अजून कोणी असणार का हे अद्याप समोर आलेले नाही. तसंच गाणं कोणी गायलं आहे हे जाणून घेण्यासाठीही रसिक उत्सुक आहेत. सध्या तमन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दरम्यान तमन्नाचा हा लूक 'आज की रात' गाण्यातील लूकसारखाच आहे. 'पुन्हा तोच लूक' म्हणत नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. तमन्ना आणि अजय देवगण यांनी याआधी २०१३ साली आलेल्या 'हिंमतवाला' सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा जोरदार आपटला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनी ती अजयच्या सिनेमात आयटम साँग करत आहे.
'रेड २' सिनेमात १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण यामधून आयकर अधिकारी अमर पटनायकच्या भूमिकेत पुन्हा धाड टाकायला येत आहे. यावेळी त्याचा रितेश देशमुखसोबत सामना आहे. रितेश देशमुख यामध्ये नेता असून त्याच्या घरी अजय धाड टाकणार आहे. मात्र रितेशही त्याला टक्क देताना दिसणार आहे.