Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी देओल बेपत्ता? पठाणकोटमध्ये लागले पोस्टर्स, 50 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:48 IST

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सरना बसस्टॅण्डवर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत.

'गदर 2' (Gadar 2) मधून बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सनी देओलची (Sunny Deol) जादू बॉलिवूडमध्ये परत आली आहे. 'गदर', 'घायल', 'घातक' असे सिनेमे देऊन एक काळ गाजवणाऱ्या सनीने जबरदस्त कमबॅक केले आहे. अभिनेता म्हणून सनीला यश मिळत असलं तरी तो खासदारही आहे याचा मात्र त्याला विसर पडला असल्याचं दिसून येतंय. म्हणूनच त्याच्या पठाणकोट मतदारसंघातील लोकांनी सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टरच लावले आहेत. तसेच त्याला शोधून आणणऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. 

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सरना बसस्टॅण्डवर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. हे पहिल्यांदाच झालेलं नसून याआधीही असे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर सनीने लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. मात्र तो कधीच आपल्या लोकसभा क्षेत्रात फिरकलाही नाही. म्हणूनच काल रविवारी पुन्हा सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले. लोक प्रचंड संतापलेलेही दिसले. बसमध्ये सुद्धा पोस्टर वाटप करण्यात आले. 

सनी देओल लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तो एकदाही त्याच्या मतदारसंघात गेला नाही. तिथे त्याने काहीच विकास केला नाही असा तेथील लोकांचा आरोप आहे. याचमुळे त्यांनी अशाप्रकारे विरोध प्रदर्शन केले आहे. तसंच 2024 च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाने अशा लोकांना तिकीटच देऊ नये असं म्हटलं आहे. 

टॅग्स :सनी देओलखासदारभाजपापंजाबबॉलिवूडबेपत्ता होणं