Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर होती", सोनू सूदचा मोठा खुलासा; दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:50 IST

सोनू सूदने नकाराचं कारण सांगितलं आहे. तसंच राजकारणाविषयी म्हणाला...

अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान मिळवलं आहे. शिवाय २०२० साली सगळीकडे कोरोनाने थैमान घातलं असताना सोनू देवदूत बनूनच अनेकांच्या मदतीला धावला होता. त्याने गरजूंना आपापल्या घरी पोहोचवलं होतं. त्याच्या कामाची दखल घेतली गेली होती. आता नुकतंच सोनूने मला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर होती असा खुलासा केला. 

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, "मला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर आली होती. मी नकार दिला तेव्हा उपमुख्यमंत्रिपद घे असं ते म्हणाले. ते देशातील फार पॉवरफुल लोक आहेत ज्यांनी मला राज्यसभेची सीटही ऑफर केली होती. तुम्हाला निवडणूक लढायची गरज नाही. तो काळ खूप एक्सायटिंग होता जेव्हा इतके मोठे लोक तुम्हाला भेटायला येतात. तुम्ही राजकारणात काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं. जेव्हा तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात येता तेव्हा तुम्ही वर वर जाता. जितकं वर जाल, ऑक्सिजन कमी होत जातो. मला अनेक जण म्हणाले की तुला मुख्यमंत्रि‍पदाची, उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर आलीये आणि तू नकार काय देतोय. इंडस्ट्रीत मोठमोठे कलाकार ज्याचा विचारही करु शकत नाहीत ती ऑफर तुला आली आहे."

तो पुढे म्हणाला, "दोन कारणांमुळे लोक राजकारणात येतात. पैसा आणि ताकद. मला दोन्हीची क्रेझ नाही. मदत तर मी अशीही करतच आहे. त्यामुळे राजकारणाच्या जगात मी किती सहजतेने वावरेन मला माहित नाही. जर राजकारणात गेल्यावर कोणी मला म्हणालं की याची मदत करु नको, त्याची करु नको. तर ते मला पटणार नाही. इथे मी कोणालाच काही विचारत नाही. सगळ्यांची मदत करतो. ना जात ना धर्म ना भाषा पाहतो. राजकारणात गेल्यावर मी उत्तर द्यायला बांधील असेल. माझं स्वातंत्र्य जाईल याची मला भीती वाटते. माझ्याकडे सुरक्षाव्यवस्था, पॉवर, दिल्लीत घर हे सगळं येईल पण सध्या मी राजकारणात यायला तयार नाही. कदाचित भविष्यात याचा विचार करेन."

सोनू सूदचा 'फतेह' हा सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज होत आहे. सोनूनेच सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. जॅकलीन फर्नांडिझही यामध्ये भूमिकेत आहे.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडराजकारणमुख्यमंत्री