Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एका आठवड्यात आम्हाला १० कोटी दे नाहीतर..."; प्रसिद्ध गायक बी प्राकला बिश्नोई गँगकडून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:06 IST

अॅनिमल फेम गायक बी प्राकला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांत FIR दाखल करण्यात आला आहे

प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलिवूड गायक बी प्राकला (B Praak) कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीसोबतच त्याच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे, यामुळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही धमकी थेट बी प्राकला थेट मिळाली नाहीये. त्याचा सहकारी गायक दिलनूर याच्या माध्यमातून बी प्राकला ही धमकी देण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

बी प्राकचा सहकारी गायक दिलनूरला एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अनेकवेळा फोन आले होते. त्याने फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने आपली ओळख 'आरजू बिश्नोई' अशी करून दिली. फोन करणाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, "बी प्राकला आमचा संदेश दे की आम्हाला १० कोटी रुपये हवे आहेत. तुझ्याकडे फक्त एक आठवड्याचा वेळ आहे. तू कोणत्याही देशात गेला तरी आम्ही तुला सोडणार नाही."

धमकी देणाऱ्याने दिलनूरला पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, "जर त्याने (बी प्राक) सहकार्य केले तर ठीक आहे, नाहीतर त्याला मातीत गाडून टाकू. या कॉलला हलक्यात घेऊ नका." या धमकीनंतर दिलनूरने तात्काळ पंजाबमधील मोहाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. मोहाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

ज्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले होते, त्यांचा तपास करण्याचे काम सायबर सेल करत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बी प्राक आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने यापूर्वीही बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अनेक पंजाबी गायकांना धमक्या दिल्या आहेत. आता बी प्राकसारख्या लोकप्रिय गायकाला लक्ष्य केल्यामुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : B Praak threatened by Bishnoi gang for 10 crore rupees.

Web Summary : Singer B Praak received a death threat and extortion demand for ₹10 crore from the Lawrence Bishnoi gang via his colleague. Police are investigating.
टॅग्स :बॉलिवूडमृत्यूटिव्ही कलाकारटेलिव्हिजन