Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकले शत्रुघ्न सिन्हा, म्हणाले, "खामोश! माझ्या मुलीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:25 IST

लेकीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha)  २३ जून रोजी बॉयफ्रेंडसोबत जहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज केले. आंतरधर्मीय विवाह असल्याने सुरुवातीला सोनाक्षीच्या कुटुंबियांनी विरोध केल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांच्यातील तणाव दूर झाला. सोशल मीडियावर मात्र सोनाक्षीला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. घराचं नाव 'रामायण', भावांची नावं लव आणि कुश तरी लेकीने लग्न केलं जहीर इकबालसोबत. असं म्हणत ट्रोलर्सने तिला धारेवर धरलं. आता लेकीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "आनंद बक्षींनी अशा ट्रोलर्सवर लिहिलं आहे की कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. या ओळींसमोर मी असंही जोडतो की कहने वाले अगर बेकार, बेकामकाज के हो तो कहना ही काम बन जाता है. माझ्या मुलीने काहीही गैर कायदेशीर किंवा असंविधानिक केलेलं नाही."

ते पुढे म्हणाले, "लग्न ही दोन लोकांमधील खाजगी गोष्ट आहे. कोणालाही यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मी सर्व ट्रोलर्सला सांगू इच्छितो की, स्वत:चं आयुष्य जगा. स्वत:च्या आयुष्यात काहीतरी उपयोगी करा. मला आणखी काहीही सांगायचं नाही."

तुम्ही सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नामुळे आनंदी आहात का? असा प्रश्नही त्यांना याआधी विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते की , "ही काही विचारायची गोष्ट आहे? प्रत्येक बाप या क्षणाची वाट पाहत असतो जेव्हा तो आपल्या लेकीचा हात तिने निवडलेल्या मुलाच्या हातता देईन. माझी मुलगी जहीरसोबत जास्त खूश आहे. त्यांची जोडी अशीच राहो. ४४ वर्षांपूर्वी मी सुद्धा माझ्या पसंतीची, सुंदर, यशस्वी आणि प्रतिभावान पूनमशी लग्न केले होते. आता सोनाक्षीची वेळ आहे की तिने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावे."

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हासोनाक्षी सिन्हाबॉलिवूडट्रोललग्नसोशल मीडिया