सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री त्याच्या घरातच घुसलेल्या एका अज्ञाताने हल्ला केला. सैफ सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वच हादरले आहेत. ३३ तासांनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याचं नाव शाहिद असल्याचं सांगितलं जात आहे. बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलं आहे. मात्र अद्याप पोलिसांनी याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.
सध्या बांद्रा पोलिस संशयित आरोपीची चौकशी करत आहेत. चोरी आणि हल्ल्यासंबंधित ते प्रश्न विचारत आहेत. दरम्यान एक नवीन सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली तशीच बॅग संशयिताकडे मिळाली आहे. मात्र हा तोच आहे हे अद्याप पोलिसांनी कन्फर्म केलेलं नाही. याचा चेहरा आरोपीशी मिळताजुळताच दिसत आहे. बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये त्याला आणतानाचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.
या भयानक हल्ल्यात सैफच्या शरिरात घुसलेल्या चाकूचा फोटोही रुग्णालयाने जारी केला आहे. २.५ इंचाचा चाकुचा तुकडा त्याच्या पाठीतून बाहेर काढण्यात आला. लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ५ तासांच्या सर्जरीनंतर तो बाहेर काढला.
सध्या सैफ धोक्याबाहेर आहे. त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पोलिस संशयित आरोपीची कसून चौकशी करत आहेत. हा तोच आरोपी आहे का आणि तो कोणत्या उद्देशाने आला होता हे लवकरच समजेल.