'फुकरे' फेम अभिनेत्री रिचा चड्डा (Richa Chadha) पालकत्वाचा अनुभव घेत आहे. लेकीच्या जन्मानंतर ती आईची ड्युटी निभावत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. तिचं नाव जुनैरा इदा असं ठेवण्यात आलं. जुनैरा आता एक वर्षाची झाली आहे. नुकतंच रिचा चड्डाने एका मुलाखतीत प्रेग्नंसी, डिप्रेशन आणि लेकीसाठी पझेसिव्ह होणं हा सगळा अनुभव सांगितला आहे. जगात सुरु असलेली परिस्थिती पाहता मुलीला जन्म द्यायला तिला भिती वाटत होती असाही तिने खुलासा केला.
लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत रिचा चड्डाने सगळा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, "मी प्रेग्नंट आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी खूप घाबरले होते. माझ्या मनात एकच विचार आला की सध्याचं वातावरण तापलेलं आहे. ठिकठिकाणी लोकांचे जीव जात आहेत. जगात बरीच गडबड सुरु आहे. अशात मूल जन्माला घालणं योग्य असेल का?"
ती पुढे म्हणाली,"जेव्हा तुम्हाला स्वत:चीच खूप जास्त सवय असते तेव्हा आणखी एका जीवाची जबाबदारी घेणं खूप अवघड असतं. कमीत कमी सुरुवातीच्या सहा महिन्यापर्यंत बाळाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं ही मोठी जबाबदारी असते. म्हणूनच मी घाबरले होते. मी विचार करत होते, हे देवा, आता माझं आयुष्य संपणार?"
मग मला जेव्हा समजलं की मुलगी होणार आहे तेव्हा माझ्या भीतीचं रुपांतर प्रोटेक्टिव्ह नेचरमध्ये झालं. (हसतच) मी विचार केला आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल. मग म्हटलं नाही, आपण सगळं नीट करु. आपण बाळाला आपल्यासारखंच मजबूत बनवू."असंही ती म्हणाली.