दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती तर सर्वांनाच माहित आहे. हवेची पातळी खूप घसरली आहे. तेथील हवेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. असं असतानाही एका लग्नसमारंभात जोरजोरात फटाके फोडण्यात आले. यावर अभिनेत्री रिचा चड्डाने (Richa Chadha) संताप व्यक्त केला आहे. एका ट्विटर युझरचा व्हिडिओ शेअर करत तिने तिचं मत लिहिलं आहे.
एका ट्विटर युझरने दिल्लीतील एक व्हिडिओ ट्विट केला. यामध्ये लग्नाच्या वरातीत फटाके वाजत आहेत. '1000+AQI साजरा होतोय असं कॅप्शन त्यात लिहिण्यात आलं आहे.' हे ट्वीट रिट्वीट करत रिचा लिहिते, "दिल्लीत जगणं म्हणजे मृत्यदंडासारखं आहे. हे शहर जिथे माझं बालपण गेलं, शाळेत शिक्षण घेतलं, माझं मूळ शहर..स्वत:बद्दल इतकी उदासीनता आण तीव्र द्वेष पाहुन खूप वाईट वाटतंय. आपण जोवर स्वत:साठी बोलणार नाही तोवर राजकारणी काहीही करणार नाहीत."
रिचा चड्डा काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीी जन्म दिला आहे. जुनैरा असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. रिचा आणि अलीने बाळाची झलकही सोशल मीडियावर शेअर केली. सध्या रिचाने कामातून ब्रेक घेतला असून ती लेकीच्या संगोपनात व्यस्त आहे. तर अली फजल त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सच्या तयारीला लागला आहे. रिचाने लेकीच्या जन्माआधी संजय लीला भन्साळींची सीरिज 'हीरामंडी' मध्ये भूमिका साकारली होती.