सध्या आयपीएल(IPL) चीच क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा आहे. काल झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) सामन्यात राजस्थानच्या रॉयल्स संघाच्या फक्त १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) कमाल केली. केवळ ३५ बॉलमध्ये त्याने शतक ठोकले. राहुल द्रविडलाही अक्षरश: व्हीलचेअरवरुन उठून जोरजोरात टाळ्या वाजवत या अफलातून खेळाडूचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान मनोरंजनविश्वातूनही या युवा क्रिकेटपटूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अर्जुन कपूर, ते विकी कौशल सगळेच झाले वैभवचे 'फॅन'
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीनंतर सगळेच अवाक झालेत. क्रिकेटविश्वात त्याचीच चर्चा आहे. मनोरंजनसृष्टीतूनही वैभववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री आणि पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटाने (Preity Zinta) ट्वीट करत लिहिले, "वॉव! वैभव सूर्यवंशी...१४ वर्षीय मुलाला ३५ चेंडूत शतक करताना बघून मजा आली. काय अद्भूत टॅलेंट आहे. यावर्षीचं आयपीएल फायर आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्वल आहे."
तर अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "मुला, तुझ्या टॅलेंटला सलाम. अद्वितीय! १४ वर्षीय मुलगा स्वप्न जगत आहे."
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) लिहितो,"बूम! वैभव सूर्यवंशी...आयपीएलमध्ये वेगवान शतक झळकवणारा दुसरा खेळाडू. राजस्थान रॉयल्सच्या या छोट्या मुलाने वय हा केवळ आकडा असल्याचं दाखवून दिलं आहे. फायर आहे. स्वप्नाला त्याला परवानगीची किंवा बर्थ सर्टिफिकेटची गरज नाही. कोणत्याही स्टेजवर, कोणत्याही गेममध्ये हे नाव लक्षात ठेवा. हा क्षण स्मरणात ठेवा. जा, इतिहास घडवा."
विकी कौशलने (Vicky Kaushal) स्टोरी शेअर करत लिहिले, "युगायुगांसाठी लक्षात राहणारी खेळी. प्रतंड आदर."