इंग्लंड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमींना चांगलाच धक्का बसला. भारताला हा सामना जिंकण्याच्या अनेक संधी होत्या. परंतु भारताच्या हातून विजय निसटला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना हरताच अनेकांनी अक्षय कुमारला दोष दिला आहे. त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
अक्षयमुळे भारताने हा सामना गमावला
झालं असं की, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला फक्त २२ रन्सने हरवलं. हा सामना पाहायला अक्षय कुमार स्टेडियममध्ये उपस्थित होता. अनेकांनी अक्षय सामना पाहायला आल्यामुळे त्याचं कौतुक केलं. परंतु अनेकांनी भारताने जो सामना गमावला, त्यासाठी अक्षयला दोष दिला. एका युजरने x वर लिहिलं की, "अक्षय कुमार जेव्हा जेव्हा भारताला सपोर्ट करायला मैदानात येतो तेव्हा भारत सामना हरतो". आणखी एका युजरने लिहिलं की, "जेव्हा जेव्हा अक्षय स्टेडियममध्ये उपस्थित असतो तेव्हा तेव्हा भारत एकही मॅच जिंकत नाही."
कालच्या सामन्यात रविंद्र जडेजाने शेवटपर्यंत भारताच्या बाजूने खिंड लढवली. त्यामुळे रविंद्र जडेजाच्या बायोपिकमध्ये अक्षय काम करेल, असंही म्हणत नेटकऱ्यांनी अक्षयची खिल्ली उडवली. अक्षयने लॉर्ड्सच्या मैदानावर रवी शास्त्रींच्या बाजूला बसून हा सामना पाहिला. अक्षय कुमारच्या वेगळ्या लूकचंही अनेकांनी कौतुक केलं.
भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी
भारताने काल इंग्लंडविरुद्ध सामना गमावला. पहिल्या दोन कसोटी सामन्यात बॅटिंगमध्ये जी धमक दिसली ती अचानक गायब झाली. लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी निश्चितच आव्हानात्मक होती. पण टीम इंडियासाठी १९३ धावा फार नव्हत्या. टीम इंडियातील युवा ऑल राउंडरसह चार फलंदाजांपैकी एकाने बॅटिंगवेळी बुमराह-सिराज यांच्याप्रमाणे खेळी खेळली असली तर टीम इंडियाला लॉर्ड्सचं मैदाना अगदी आरामात मारता आलं असते.