९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आणि सध्या बॉलिवूडच नव्हे तर साउथ इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे बॉबी देओल (Bobby Deol) बॉबीचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. 'अॅनिमल' चित्रपटाच्या यशानंतर बॉबीच्या करिअरला जणू नवसंजीवनी मिळाली. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला बॉबी कोणे एके काळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होता. ती अभिनेत्री बॉबीचं पहिलं प्रेम होती. कोण होती ही अभिनेत्री? जाणून घ्या
ही अभिनेत्री होती बॉबीचं पहिलं प्रेम
बॉबी देओल ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता तिचं नाव नीलम कोठारी. नीलम आणि बॉबी यांचे प्रेमसंबंध सुमारे ५ वर्षे टिकले. बॉबी देओल अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच तो आणि नीलम रिलेशनशीपमध्ये होते. नीलम त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नायिका होती आणि तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले होते. बॉबी आणि नीलम यांचं लग्नही ठरणार होते. पण एका व्यक्तीला बॉबीचं हे नातं मान्य नव्हतं.
बॉबी देओल आणि नीलम यांचं नातं लग्नाच्या जवळ पोहोचलं होतं. पण एका रिपोर्टनुसार, बॉबी देओलचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना हे नातं मंजूर नव्हतं, त्यामुळे त्यांनी या नात्याला विरोध दिला. वडिलांचा विरोध असल्याने बॉबी देओलने नीलमसोबत परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वेगळं झाल्यानंतर एकमेकांच्या नात्याचा आदर ठेवत बॉबी आणि नीलम यांनी सार्वजनिकरित्या कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं नाही. त्या काळात नीलमचं नाव गोविंदासोबतही जोडलं गेलं होतं.
नीलम कोठारीसोबतच्या ब्रेकअपनंतर, बॉबी देओलने फॅशन डिझायनर तान्या आहुजाशी लग्न केले. दोघांनी १९९६ मध्ये लग्नगाठ बांधली. आज बॉबी आणि तान्या यांना आर्यमन आणि धरम अशी दोन मुलं आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन खूप यशस्वी असून, तान्याने बॉबी देओलच्या कठीण काळात त्याला नेहमी साथ दिली आहे. नीलम कोठारीने देखील नंतर प्रसिद्ध अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले. नीलम सध्या यशस्वी ज्वेलरी डिझायनर आहे. ती सध्या 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये दिसत आहे.