Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 15:05 IST

कोर्टाने बीएमसी कारवाई अवैध असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे कंगना आनंदी झाली आहे. ट्विटरवरून तिने हा आनंद व्यक्त केलाय.

कंगना रणौतच्या ऑफिसचा काही भाग बीएमसीने अवैध असल्याचं सांगितलं होतं. ९ सप्टेंबरला तिचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. याचा विरोध करत कंगनाने कायद्याचा आधार घेतला होता. याप्रकरणी बॉम्बे हाय कोर्टाने कंगनाच्या पक्षात आपला निर्णय दिला. कोर्टाने बीएमसी कारवाई अवैध असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे कंगना आनंदी झाली आहे. ट्विटरवरून तिने हा आनंद व्यक्त केलाय.

कंगना रणौतने ट्विट लिहिले आहे की, 'जेव्हा एखादी व्यक्ती सरकार विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा हा एका व्यक्तीचा विजय नसतो. तो लोकशाहीचा विजय असतो. तुम्हा सर्वांचे धन्यवाद ज्यांनी मला हिंमत दिली आणि त्या लोकांचे धन्यवाद जे माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसले. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावण्याचं एक कारण आहे की, मी हिरोची भूमिका साकारू शकेन'. (स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज)

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत कंगनाची वास्तू नवीन नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने ७ आणि ९ सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

कंगनाने हायकोर्टात कार्यालयाचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. यावर हायकोर्टाने कार्यालयाच्या झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२१ पर्यंत या निरीक्षकांना हायकोर्टाला अहवाल द्यावा लागणार आहे. 

कंगनालाही कोर्टाने दिला सल्ला

याचिकाकर्त्या कंगना राणौतने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यायला हवा, असा सल्ला कोर्टाने दिला. तिने केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर कोर्ट सहमत नाही. पण एखाद्या व्यक्तीने कितीही अयोग्य मतं व्यक्त केली, तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.  

टॅग्स :कंगना राणौतमुंबई हायकोर्टबॉलिवूडमुंबई महानगरपालिका