Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅनेडियन गायकाला इन्स्टाग्राम पोस्ट पडली महागात, भारतातले शो रद्द; आता दाखवलं देशप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 14:23 IST

भारत-कॅनडाचा मधील वाद आणि कॅनेडियन गायकाची पोस्ट चर्चेत

भारत आणि कॅनडामधील वाद अजूनच चिघळत आहे. दरम्यान बुक माय शो अॅपने कॅनडियन गायक शुभनीत सिंगच्या (Shubhneet Singh) लाईव्ह कॉन्सर्टचे तिकीट रद्द केले आहेत. याला कारण ठरली ती शुभनीतची इन्स्टाग्राम पोस्ट. त्याने भारताचा चुकीचा नकाशा अपलोड केला होता. यामध्ये जम्मू काश्मीर, पंजाब आणि पूर्वोत्तर राज्यांचा समावेश नव्हता. शुभनीतच्या या पोस्टनंतर अनफॉलो बुक माय शो अॅप असं ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे बुक माय शोने हे पाऊल उचललं. प्रचंड टीका झाल्यानंतर आता शुभनीतने देशप्रेम व्यक्त करणारी पोस्ट टाकली आहे. 

गायक शुभनीत सिंग मूळचा भारतीय असून तो कॅनडातच वास्तव्याला असतो. तो प्रसिद्ध गायक आहे. भारतात त्याची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याची एक इन्स्टाग्राम पोस्ट त्याला भोवली. त्याने भारताचा नकाशा पोस्ट करत त्यातून पंजाब आणि जम्मू काश्मीरलाच वगळले. यानंतर चांगलाच बवाल झाला. 

यानंतर आता शुभनीतने आणखी एक पोस्ट करत भारतावरील प्रेम व्यक्त केलंय. त्याने लिहिले,'पंजाब, भारतातून रॅपर-गायकच्या रुपात स्वत:ला आंतरराष्ट्रीय मंचावर बघणं हे माझ्यासाठी स्वप्नच होतं. मात्र नुकत्याच घडलेल्या घटनांनी मी निराश झालो आहे. यावर मला काहीतरी सांगायचं आहे. मी भारतात माझा दौरा रद्द झाल्याने खूप निराश आहे. मी आपल्या देशात आपल्या लोकांसमोर परफॉर्म करण्यासाठी खूप उत्साहित होतो. जोरात तयारी झाली होती आणि मी गेल्या दोन महिन्यांपासून अगदी आत्मियतेने सराव करत होतो. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.

तो पुढे लिहितो,'भारत माझाही देश आहे. माझा जन्म भारतात झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी माझे पूर्वज आणि गुरु बलिदान देण्यात कुठेच कमी पडले नाहीत. पंजाब तर माझ्या मनात, रक्तात आहे. मी आज जो काही आहे याचं कारण मी पंजाबी आहे. पंजाबींना देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही. इतिहासात प्रत्येक पानावर पंजाबी लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याची नोंद आहे. मी ती स्टोरी ठेवण्यामागचं कारण म्हणजे हे फक्त पंजाबसाठी मी  केलेली प्रार्थना होती. कारण रिपोर्ट्सनुसार पंजाबमध्ये वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. यामागे माझा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता.माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मी निराश झालोय. मात्र मला गुरुंनी शिकवलं आहे ती सगळी माणसं ही एक आणि सारखीच आहेत.मी मेहनत करत राहीन आणि आणखी मजबूत, मोठा होईन.'

सध्या भारत -कॅनडा वाद पाहता गायक, रॅपर शुभनीतची ही पोस्ट चर्चेत आहे. आधी भारताचा चुकीचा नकाशा ठेवून नंतर देशप्रेम दाखवल्याने नेटकरी त्याच्यावर नाराज झालेत.

टॅग्स :भारतकॅनडासोशल मीडिया