बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) आणि 'शार्क टँक इंडिया' फेम अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये तिने अशनीरच्या दिल्लीतील घरी भेट दिली. या भेटीदरम्यान अशनीरच्या आईने फराहचा कूक दिलीपबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या. त्यावेळी दिलीपच्या पगाराचा विषय चर्चेत आला.
फराह खानने केला दिलीपच्या पगाराचा खुलासा
अशनीरच्या आईने फराहला सांगितले की , ''दिलीप आम्हाला म्हणाला की, तो दिल्लीत सुरुवातीला फक्त ३०० रुपये पगारावर काम करत होता.'' हे ऐकून फराहने लगेच प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "मग तो माझ्याकडे आला तेव्हा त्याने थेट २०,००० रुपयांवरून सुरुवात का केली?" यावर अशनीरची पत्नी माधुरीने उत्तर दिले, "कारण त्याला माहित होते की तुम्ही फराह खान आहात."
फराह खानने पुढे गंमतीने सांगितले की, "२० हजार रुपयांवरून त्याने फक्त सुरुवात केली होती, आता तो किती कमावतो हे विचारूच नका." यावरून दिलीपचा पगार आता खूप वाढलेला असल्याचं स्पष्ट झालंय. दिलीप आता फराहच्या व्लॉग्समुळे प्रसिद्ध झाला असून, अनेकदा तो तिच्यासोबत इतर सेलिब्रिटींच्या घरीही दिसतो.
या व्लॉगमध्ये, अशनीरच्या आईने फराह आणि दिलीपसाठी खास पदार्थ बनवले. भेटीच्या शेवटी ग्रोवर कुटुंबाने फराह आणि दिलीप दोघांनाही भेटवस्तू दिल्या. फराहला कपडे आणि हँडमेड सजावटीच्या वस्तू मिळाल्या, तर दिलीपला एक नवीन शर्ट भेट म्हणून मिळाला. यावर फराहने पुन्हा एकदा दिलीपची मस्करी करत म्हटले, "तुझे बहुतेक शर्ट दुसऱ्यांनीच भेट दिलेले असतात!"
अशाप्रकारे दिलीप आता फक्त फराहचा कुक म्हणून ओळखला जात नाही, तर एक सोशल मीडिया स्टार बनला आहे. तो स्वतःच्या कमाईतून त्याच्या मूळ गावी (बिहार) एक मोठे घर बांधत आहे. तसेच फराहने त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला आहे.