अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीचा सुपरहिट आणि विनोदी सिनेमा 'हेरा फेरी' (Hera Pheri). या सिनेमाचा प्रत्येक जण चाहता आहे. २००० साली आलेल्या या सिनेमाला आता २५ वर्ष झाली तरी प्रेक्षकांमध्ये सिनेमाच्या ताज्या आठवणी आहेत. सध्या अनेक सिनेमे रि रिलीज होत असतानाच 'हेरा फेरी' ही रिलीज होणार अशी चर्चा आहे. प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा सिनेमा 'हेरा फेरी' पुन्हा रिलीज होणार का? निर्माते फिरोज ए. नाडियाडवाला यांनी बॉलिवूड हंगामाशी बातचीत करताना यावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. कागदावर सिनेमाचा खरा मालक मी असलो तरी नैतिकरित्या अक्षय, परेशजी आणि सुनीलचाही या सिनेमावर तितकाच अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मिळून याचा निर्णय घेऊ."
फिरोज नाडियाडवाला उत्तर देताना गालातल्या गालात हसले. याचा अर्थ त्यांच्या हसण्यात कुठेतरी होकार होता आणि सिनेमा खरोखरंच पुन्हा रिलीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच सिनेमा पुन्हा रिलीज झाला तर तो बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालेल असाही विश्वास त्यांनी यावेळी दाखवला.
'हेरा फेरी'नंतर '२००६ साली 'फिर हेरा फेरी' आला होता. तोही तितकाच गाजला होता. आजही सिनेमाचे मीम्स, डायलॉग्स व्हायरल होत असतात. अक्षयची राजूची भूमिका, परेश रावल यांचं बाबूराव आणि सुनील शेट्टीचं श्यामचं कॅरेक्टर आयकॉनिक ठरले. तर आता सिनेमाचा तिसरा भागही येणार आहे. येत्या काही महिन्यात सिनेमाचं शूट सुरु होणार आहे.