हरियाणवी चित्रपट आणि अल्बममधील प्रसिद्ध अभिनेता उत्तर कुमार याला एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी त्याला अमरोहा येथील एका फार्महाऊसमधून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. उत्तर कुमार याच्यावर एका दलित अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आणि तिच्याबाबत जातिवाचक शब्द उच्चारून अपमानित केल्याचा आरोप आहे. उत्तर कुमार याने दीर्घकाळापासून आपलं शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप या पीडित अभिनेत्रीने केला आहे.
हापुड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, २०२० मध्ये एका हरियाणवी अल्बमच्या चित्रिकरणादरम्यान उत्तर कुमारशी माझी भेट झाली होती. त्यावेळी उत्तर याने मला चांगल्या भूमिका आणि चांगले चित्रपट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र चित्रिकरणानंतर तो सातत्याने दबाव आणून माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. मी अनेकदा त्याला नकार दिला. मात्र करिअर बरबाद करण्याची धमकी देऊन तो माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. तसेच अनेकदा त्याने माझ्याबाबत जातिवाचक शब्द उच्चारून मला अपमानितही केले, असा आरोपही या अभिनेत्रीने केला होता.
दरम्यान, दीर्घकाळ शोषण सहन केल्यानंतर या पीडित अभिनेत्रीने हिंमत करून गाझियाबाद येथील शालिमार गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी लैंगिक शोषण, धमकी देणे आणि जातीवाचक टिप्पणी आदींबाबतच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस तपास करत होते. मात्र तपासाला वेग येत नसल्याने न्याय मिळावा यासाठी पीडितेने लखनौ येथे आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलिसांना आरोपी उत्तर कुमार हा अमरोहा येथील एका फार्महाऊसमध्ये लपलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.