Join us

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला मोठा झटका! युट्यूबवरुन हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी, भारतात चित्रपटावरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:30 IST

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ‘अबीर गुलाल’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

Abir Gulaal Movie Banned : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) यांचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट येत्या ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर, सरकारने मोठा निर्णय घेत या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. या दरम्यानच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या भारतीय युट्यूब चॅनेलवरून ‘अबीर गुलाल’ची सगळी गाणी काढून टाकली आहेत.

‘अबीर गुलाल’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाची ‘खुदाया इश्क’ आणि ‘अंग्रेजी रंग रसिया’ ही दोन गाणी युट्यूबवर प्रदर्शित केली होती. मात्र, आता ही दोन्ही गाणी युट्यूबवरून हटवण्यात आली आहेत. चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस ‘अ रिचर लेन्स एंटरटेनमेंट’च्या अधिकृत चॅनेलवरून ही गाणी काढून टाकली गेली आहेत. या चित्रपटाचे अधिकृत संगीत अधिकार खरेदी केलेल्या ‘सारेगामा’च्या युट्यूबवरून देखील ही गाणी उडवण्यात आली आहेत. एकीकडे भारतात आतंकवादी हल्ले होते आहेत, तर दुसरीकडे भारत-पाक कलाकारांना एकत्र आणून चित्रपट बनवले जात असल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरचा जनप्रक्षोभ पाहता निर्मात्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मात्र, यावर अद्याप मेकर्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

फवाद खानने आतंकवादी हल्ल्यावर दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “पहलगाममध्ये झालेल्या भयानक हल्ल्याची बातमी ऐकून खूप धक्का बसला. या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना. आम्ही प्रार्थना करतो की, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो आणि ते लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडोत”, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.

अभिनेत्री वाणी कपूरनेही केला निषेध

‘अबीर गुलाल’ चित्रपटावर टीका होत असतानाच या चित्रपटाची अभिनेत्री वाणी कपूर हिने देखील एक पोस्ट लिहित पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहिली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “जेव्हा मी पहलगाममध्ये निर्दोष लोकांवर हल्ला होताना पाहिला, तेव्हापासून मला प्रचंड धक्का बसला आहे. काहीही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप दुःखी आहे. माझ्या प्रार्थना त्या सगळ्यांच्या कुटुंबासोबत आहेत.”

‘अबीर गुलाल’वर भारतात बंदी!

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तब्बल २८ निष्पाप लोकांचा दुर्दैवी बळी गेला. या हल्ल्यात काही लोक गंभीर जखमी झाले. या नरसंहारामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत होती. भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणे पटत नसल्याचे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. अखेर गुरुवारी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले की, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनीत 'अबीर गुलाल' चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही.

देशभरातील बहुतांश चित्रपटगृहांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला असून, अनेक संघटनांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) देखील पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली. भारतीय मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञांना कोणतीही मदत न करण्याचे आवाहन एफडब्लूआयसीईच्या वतीने करण्यात आले आहे.

मनसेनीही केलेला विरोध

याआधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. मनसेने आधीच इशारा देत, हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे म्हटले होते. पाकिस्तानने नेहमीच आतंकवादाला खतपाणी घातलं आहे, तिथल्या कलाकारांना भारतात काम करू दिल्याने त्यांची मदत होतेय, त्यांना आर्थिक पाठबळ मिळतंय, असं मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं.

भारतीय-पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटाचे शूटिंग झाले लंडनमध्ये!

अभिनेता फवाद खान याने याआधी देखील काही भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. इतक्या वर्षांनंतर फवाद पुन्हा एकदा भारतीय मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत होता. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटात फवाद खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर, लिसा हेडन, रिद्धी डोग्रा, फरीदा जलाल, सोनी राजदान आणि अभिनेता परमीत सेठी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार होते. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले होते. तर, हा चित्रपट ९ मे या दिवशी रिलीज होणार होता.

टॅग्स :फवाद खानवाणी कपूरबॉलिवूडसिनेमा