बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एक देखणा, दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. धर्मेंद्र यांचं निधन झाल्यावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात, ''धर्मेंद्र जी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक अलौकिक अभिनेते आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत ते खोल शिरायचे. विविध प्रकारच्या भूमिका ते ज्या सहजतेने आणि खास पद्धतीने साकारायचे, त्यामुळे त्यांनी कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा, नम्रता आणि प्रेमळ स्वभावासाठीही तेवढेच लोकप्रिय होते.. या दुःखद क्षणी, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत आहेत.''
'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे. अनेक वेळा 'शोले'मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात. 'धरम वीर', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'अनुपमा', 'मेरा गाँव मेरा देश' आणि 'ड्रीम गर्ल' ह्यासारख्या जवळपास २५० सुप्रसिद्ध कलाकृतीत धर्मेंद्र ह्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. सिनेसृष्टीच्या 'धरम पाजीं'ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.''राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली. ते लिहितात, '' ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं.''
''१९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं. करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन..''उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहितात, ''बॉलिवूडचा ही-मॅन हरपला..! बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. आपल्या साठ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या अदाकारीने माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचे काम केले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर, अपने, लाईफ इन अ मेट्रो, यांसारख्या असंख्य सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवली. बॉलिवूड हिरोच्या प्रतिमेला धर्मेंद्र यांनी नवीन आयाम मिळवून दिला.. मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याने राजकीय आखाड्यात देखील आपले नशीब आजमावले.''
अजित पवार यांनी पोस्ट करुन लिहिलंय की, ''हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे.''
धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो.''केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोस्ट करुन लिहिलंय की, ''हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार श्री धर्मेंद्र जी यांच्या निधनाने खूप दुःख होत आहे. त्यांनी त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाने आणि प्रामाणिकपणाच्या बळावर अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांना जिवंत केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे उल्लेखनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.''
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लिहितात, ''आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सहा दशकांहून अधिक काळ प्रत्येक देशवासीयाच्या हृदयाला स्पर्श करणारे धर्मेंद्र जी यांचे निधन, भारतीय चित्रपटसृष्टीचे न भरून येणारे नुकसान आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.''
''धर्मेंद्र जी हे त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी ज्या भूमिकेला स्पर्श केला, ती सजीव झाली आणि याच कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वयोगटातील कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयातून ते सदैव आपल्यामध्ये जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ॐ शांती शांती शांती.''
Web Summary : Veteran actor Dharmendra passed away at 89. Political leaders like Modi, Pawar, and Thackeray paid tribute, remembering his iconic roles and impact on Indian cinema. He was cremated in Vile Parle.
Web Summary : दिग्गज अभिनेता धर्मेंद्र का 89 वर्ष की आयु में निधन हो गया। मोदी, पवार और ठाकरे जैसे राजनीतिक नेताओं ने श्रद्धांजलि अर्पित करते हुए उनकी प्रतिष्ठित भूमिकाओं और भारतीय सिनेमा पर प्रभाव को याद किया। विले पार्ले में उनका अंतिम संस्कार किया गया।