No Entry 2: 'नो एन्ट्री' चित्रपट हा बॉलिवूडमधील सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या सीक्वलची जोरदार चर्चा सुरू आहे. 'नो एन्ट्री' हा चित्रपट २००५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. यात सलमान खान(Salman Khan), अनिल कपूर(Anil kapoor), फरदीन खान, लारा दत्ता (Lara Dutt), बिपाशा बासू, ईशा देओल आणि सेलिना जेटली यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. परंतु या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये पहिल्या भागातील कलाकार दिसणार नाहीत. त्यांच्या जागी नव्या कलाकारांना कास्ट करण्यात येणार आहे. दरम्यान, 'नो एन्ट्री-२' बद्दल आता चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी खुलासा केलाय.
नुकतीच बोनी कपूर यांनी 'न्यूज 18 Showsha' ला मुलाखत दिली. "मी बराच वेळ वाट पाहिली आहे. पण, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. मी त्या सगळ्यांचा आदर करतो शिवाय त्यांचा निर्णयही मला मान्य आहे. आता 'नो एन्ट्री'च्या सीक्वलमध्ये नवे चेहरे पाहायला मिळतील."
पुढे बोनी कपूर म्हणाले, "मला विश्वास आहे की हा सीक्वेल नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ज्यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली त्यांपैकी सगळ्यांनी हा चित्रपट पहिल्या पार्टपेक्षा उत्तम असेल, अशी प्रतिक्रिया दिली."
दरम्यान, 'नो एन्ट्री-२' ची शूटिंगची २०२५ मध्ये सुरूवात होणार आहे. त्यासोबत २०२५ च्या दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं सांगण्यात येत आहे. या सीक्वलमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळतील. परंतु चित्रपटात फीमेल लीड कोण साकारणार? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.