Join us

"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:49 IST

रॅपर बादशाहने इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाला बादशाह?

संपूर्ण जगात एका घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. ती म्हणजे इस्कॉन मंदिरात एका व्यक्तीने मुद्दाम चिकन खाल्लं. लंडनच्या इस्कॉन गोविंदा रेस्टॉरंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका व्यक्तीने इस्कॉन मंदिरातील शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये मुद्दाम KFC चिकन आणून खाल्लं. त्यामुळे सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे श्रद्धेचा अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या गंभीर प्रकरणावर बॉलिवूडचा गायक आणि रॅपर बादशाहने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

रॅपर बादशाहची संतप्त प्रतिक्रिया

या प्रकारावर प्रसिद्ध रॅपर बादशाहने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करत म्हटलं, "यामुळे तो खात असलेल्या चिकनलाही लाज वाटली असावी. त्या माणसाला चिकनची भूक नव्हती, त्याला चपलेचा मार द्यायची गरज होती. जे समजत नाही तेही समजून घेणं आणि त्याचा आदर करणं यातच खरी खरी ताकद आहे", अशी प्रतिक्रिया रॅपर बादशाहने केली आहे. लोकांनी बादशाह जे बोलला त्यावर समर्थन दर्शवलं असून त्या व्यक्तीवर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. बादशाह जे म्हणाला त्यानुसार अनेकांनी त्या व्यक्तीला चोप देऊन अद्दल घडवण्याची मागणी केली आहे. 

काय घडलं नेमकं?

जगभरात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक आफ्रिकन-ब्रिटिश युवक इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्ये बसून केएफसीचा चिकनचा बॉक्स उघडतो आणि खाण्यास सुरुवात करतो. या वेळी तो रेस्टॉरंटमधील लोकांना मुद्दाम त्रासदायक पद्धतीने विचारतो, "हे रेस्टॉरंट व्हेज आहे का?" आणि जेव्हा कर्मचारी त्याला स्पष्ट सांगतात की, येथे कांदा, लसूण आणि मांस वापरण्यात येत नाहीत, तेव्हा तो त्यांच्याच समोर चिकन खाऊ लागतो. या कृतीमुळे रेस्टॉरंटमधील वातावरण तणावपूर्ण झालं आणि लोकांनी त्याला रागाने हाकलून दिलं. लंडनमध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बादशहाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड