Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत अपयश मिळाल्यास घाबरून जाऊ नका... हे कलाकार देखील झाले होते नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 19:28 IST

बॉलिवूड आणि मराठीमधील अनेक कलाकारांना शिक्षण घेताना अपयशाची चव चाखायला लागली होती.

ठळक मुद्देसुबोधने म्हटले होते की, मी बारावीत नापास झालो नसतो तर बहुधा आज मिळालेले यश मला मिळालेच नसते.

आज बारावीचा निकाल लागला असून काहींना या परीक्षेत यश मिळाले असेल तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला असेल. पण तुम्हाला अपयश आले असेल तर काहीही चिंता करू नका... आजवर शिक्षणात अपयश मिळून देखील अनेकांनी आयुष्यात प्रचंड प्रगती केली आहे. बॉलिवूड आणि मराठीमधील अनेक कलाकारांना देखील शिक्षण घेताना अपयशाची चव चाखायला लागली होती. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रेटी...

अक्षय कुमार अक्षय कुमारला आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता मानले जाते. तो लाखों-करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. त्याने आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अक्षय शाळेत असताना एका इयत्तेत नापास झाला होता. त्यानेच ही गोष्ट सांगितली होती. पण त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला न ओरडता त्याला धीर दिला होता आणि तुला ज्या क्षेत्रात रस असेल त्याच क्षेत्रात करियर कर... असा मोलाचा सल्ला दिला होता. 

अतुल कुलकर्णीअतुल कुलकर्णीने आज मराठी आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सामाजिक विषयाचे भान असलेला अभिनेता अशी अतुलची ओळख आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अतुल बारावीला नापास झाला होता ही गोष्ट त्यानेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती. मी बारावीत पास झालो असतो तर या क्षेत्रात येण्याची मला संधी मिळाली नसती अशी प्रांजळ कबुली त्याने या मुलाखतीत दिली होती. 

कंगना रणौतकंगनाने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. नायिकाप्रधान चित्रपट करण्याकडे तिचा कल असतो. कंगनाने दहावी झाल्यानंतर सायन्सला अॅडमिशन घेतले होते. पण ती बारावीत एका विषयात नापास झाली. तिने त्यानंतर अभिनयामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आणि या क्षेत्रात यश देखील मिळवले. 

नागराज मंजुळेनागराजने सैराट, फँड्री सारखे अतिशय चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याच्या सैराटने तर १०० कोटीपेक्षा जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. मराठीत यश मिळाल्यानंतर आता तो झुंड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. त्याच्या या पहिल्याच हिंदी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नागराज दहावीत असताना दोनदा नापास झाला होता. त्यानेच विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्याचा दहावीचा निकाल सोशल मीडियावर शेअर केला होता. 

सुबोध भावेतुला पाहते रे ही मालिका सध्या प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला सुबोधदेखील बारावीत नापास झाला होता. त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने म्हटले होते की, मी बारावीत नापास झालो नसतो तर बहुधा आज मिळालेले यश मला मिळालेच नसते. मी बारावीत पास झालो असतो तर इतरांप्रमाणे मी देखील बीएस्सी अथवा बीई केले असते आणि कुठेतरी नोकरी करत असतो. पण माझ्या नापास होण्यानेच माझे आयुष्य संपूर्णपणे बदलले. 

टॅग्स :नागराज मंजुळेसुबोध भावे अक्षय कुमारकंगना राणौतअतुल कुलकर्णी