Vidya Balan: अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बंगाली चित्रपटातून करिअरची सुरुवात करत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये विद्या बालनने 'पा' चित्रपटात अमिताभ बच्चनयांच्यासोबत काम करण्यास अनेकांचा विरोध होता असं तिने उघडपणे सांगितलं.
अलिकडेच 'फिल्मफेअर' ला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने 'पा' चित्रपटाचा एक किस्सा शेअर केला आहे. या चित्रपटात तिने 'बिग बीं'च्या आईची भूमिका साकारली होती. त्याविषयी बोलताना तिने सांगितलं की, "जेव्हा आर बाल्की यांनी मला पा मधील भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा मीच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार केला. त्यावेळी त्यांना अभिषेक आणि मी मिस्टर बच्चन यांच्या पालकांची भूमिका करावी, असं वाटत होतं. मी त्याकडे दूर्लक्ष केलं. पण, जेव्हा त्यांनी मला पा चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा माझ्यातील कलाकार जागा झाला. मला ती स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा वाचावी, असं वाटत होतं. शिवाय मी घाबरले देखील होते."
त्याने पुढे अभिनेत्रीने म्हटलं की ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी तिला अनेक लोकांनी ही भूमिका करण्यास विरोध केला होता. त्यादरम्यान ती म्हणाली, "बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की आईची भूमिका केल्याने माझं करिअर संपेल. पण, तेव्हा मी माझ्या एका लेखक आणि एका चित्रपट निर्माता असलेल्या मित्राने चित्रपटाची कथा वाचली आणि त्यांना मी ती भूमिका करावी असं वाटलं. त्यानंतर मी कोणाचही न ऐकता स्वत: च्या मनाचं ऐकलं. मी याआधी देखील असे चित्रपट केले होते, ज्यामध्ये काम करताना मला आनंद मिळाला नाही. पण, ते चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला." असा खुलासा अभिनेत्रीने केला.