Fatima Sana Shaikh: 'दंगल', 'लुडो', 'अजीब दास्ताँ' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh). 'दंगल' या सिनेमात तिने गीता फोगटची भूमिका निभावली, तिच्या या कामाचं सगळ्यांनी भरभरुन कौतुक केलं. यानंतर अभिनेत्रीने 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपटात आमिर खानसोबत एकत्र काम केलं. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याचा परिणाम फातिमाच्या फिल्मी करिअरवर झाला, त्यामुळे अभिनेत्रीला असंख्य अडणींचा सामना करावा लागला होता. याबद्दल तिने एका मुलाखतीत खुलेपणाने भाष्य केलं आहे.
नुकतीच फातिमा शेखने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे. त्यावेळी मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "एक दिग्दर्शक म्हणून पाहायचं झालं तर, एखादा सिनेमा जर फ्लॉप झाला तर त्यांच्यासाठी दुसरा सिनेमा बनवणं कठीण असतं. कलाकारांच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं. तुम्हाला काही चित्रपटांमधून रिजेक्ट करण्यात येतं. हे माझ्यासोबत घडलं आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' फ्लॉप झाल्यानंतर मला दोन चित्रपटांमधून बाहेर काढलं. पण, मी या गोष्टींकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं. निर्मात्यांचा हा निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्यच होता."
वर्कफ्रंट
दरम्यान, फातिमा सना शेख हिने 'चाची 420' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या सिनेमात तिने भारतीची (तब्बूच्या तरुणपणीची) भूमिका साकारली होती. त्यानंतर ती २०१६ मध्ये दंगल या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली. फातिमा गेल्यावर्षी 'सॅम बहादुर' सिनेमात दिसली. तसंच तिचा 'धक धक' सिनेमाही आला. यानंतर अद्याप ती कोणत्याही सिनेमात लीड रोलमध्ये दिसलेली नाही.