Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रात्री १ वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला कारण...", 'छावा'निमित्त विकी कौशलने सांगितला खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:27 IST

"सगळं देवावर सोपवलं होतं कारण...", 'छावा' फेम विकी कौशल असं का म्हणाला?

Vicky kaushal : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) या चित्रपटाची मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal)मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच 'छावा'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, त्याला प्रेक्षकांची सुद्धा पसंती मिळाली. शिवाय या सिनेमातील नवीन गाण्याची चर्चा होती. परंतु 'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर विकी कौशलच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

'एबीपी न्यूज' सोबत खास बातचीत करताना विकी कौशलने छावा सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगदरम्यानचा प्रसंग सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, "छावा'चा ट्रेलर जेव्हा लॉन्च झाला तेव्हा मी खूप घाबरलो होतो, रात्री १ वाजता ट्रेलर आला होता. ट्रेलर कसा आहे वगैरे या गोष्टीचं मला टेन्शन आलं होतं. कारण त्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली होती. त्यावेळी मी फोन देव्हाऱ्यात ठेवला आणि प्ले बटणं दाबलं. मी तेव्हा सगळं देवावर सोपवलं होतं. ट्रेलर कसा आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला."

पुढे अभिनेता म्हणाला, "मग मी ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना तो दाखवला. तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात तर अश्रू आले होते. बाबा आणि कतरिनाला ट्रेलर प्रचंड आवडला. शिवाय चाहत्यांच्या सुद्धा ट्रेलर पसंतीस उतरला." असा खुलासा अभिनेत्याने केला.

'छावा' हा बहुचर्चित सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांसह अनेक दमदार कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा