Vicky kaushal: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) हा बहुचर्चित सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या संपूर्ण देशभरात या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. दरम्यान, मनोरंजनविश्वात चित्रपटामधील कलाकारांच्या कास्टिंगबद्दल सुद्धा बरीच चर्चा होताना दिसतेय. 'छावा' मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. तर ‘छावा’मध्ये अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विकी कौशलनेअक्षय खन्नाच्या ट्रान्सफॉर्मेशनवर भाष्य केलं आहे.
'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विकी कौशलने 'छावा' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से शेअर केले. त्यावेळी मुलाखतीमध्ये अभिनेता अक्षय खन्नाच्या लूकबद्दल म्हणाला, "मला चित्रपटात त्यांचा लूक कसा असणार हे दाखण्यासाठी काही फोटो देण्यात आले होते. ते फोटो पाहिल्यानंतर मी हैराण झालो होतो. जेव्हा मी त्यांना 'छावा'च्या सेटवर त्या लूकमध्ये पाहिलं, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी ते पात्र जिवंत केलं. त्यांनी साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून प्रेक्षक सुद्धा दंग होतील." असा खुलासा अभिनेत्याने केला.
दरम्यान, 'छावा' सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर औरंजेबाची भूमिका कोण साकारणार यावरुन सुद्धा पडदा हटवण्यात आला होता. औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना आहे. पांढरी दाढी, केस आणि डोक्यावर शाही मुकुट अशा लूकमध्ये अक्षय खन्नाला पाहून प्रेक्षक देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांसह अनेक दमदार कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.