Dheeraj Kumar Death: प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते धीरज कुमार यांचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालंय. शनिवारी संध्याकाळी निमोनिया झाल्यामुळे त्यांना कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज यांच्या कुटुंबाने अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. धीरज यांचे चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
धीरज कुमार यांंचं निधन
धीरज कुमार यांच्या कुटुंबाने अधिकृतपणे सांगितलंं की, 'आम्हाला कळवण्यात अत्यंत दुःख होतंय की, प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना निमोनिया झाल्याने उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. मनोरंजन जगात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एका प्रतिभावान निर्मात्याच्या निधनाबद्दल संपूर्ण इंडस्ट्री शोक व्यक्त करत आहे. या कठीण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'
धीरज कुमार यांची कारकीर्द
धीरज कुमार यांनी १९६५ मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. सुभाष घई आणि राजेश खन्ना यांच्यासोबत एका टॅलेंट शोमध्ये ते अंतिम फेरीत होते, ज्यामध्ये राजेश खन्ना विजेते ठरले. धीरज यांनी १९७० ते १९८४ पर्यंत तब्बल २१ पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 'क्रिएटिव्ह आय' नावाची निर्मिती कंपनी सुरू केली, ज्याचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'स्वामी' सिनेमातील 'का करुण सजनी, आये ना बलम' हे गाणे त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणं खूप लोकप्रिय झालं.त्यांनी 'हीरा पन्ना' आणि 'रतों का राजा' सारख्या सिनेमांमध्येही काम केले. त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकप्रिय धार्मिक मालिका आणि 'ओम नमः शिवाय' सारख्या गाजलेल्या टीव्ही शोची निर्मिती केली. टेलिव्हिजनवर ३५ हून अधिक शोची निर्मिती करणारे धीरज कुमार यांनी 'अदालत', 'मिली', 'घर की लक्ष्मी बेटियां' सारख्या लोकप्रिय शोची निर्मिती करुन प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळवलं.
अलीकडेच, धीरज यांनी नवी मुंबई, खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थिती दर्शवली होती. त्यांनी सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, इस्कॉन मंदिराला भेट देऊन त्यांना शांती मिळाली आणि तेथील लोकांचे प्रेम त्यांना खूप भावले. धीरज यांच्या निधनाने सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.