Akshay Kumar: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखल जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). सध्या अभिनेता 'स्काय फोर्स' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. दरम्यान, अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांपेक्षा फिटनेसमुळेही चर्चेत येत असतो. त्याचा अभिनय आणि चित्रपटातील हटके स्टंट प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतात. अशातच अक्षय कुमार 'स्काय फोर्स'च्यानिमित्ताने ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने १९९८ मध्ये आलेल्या 'अंगारे' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा खास किस्सा शेअर केला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने महेश भट दिग्दर्शित 'अंगारे' चित्रपटाच्या वेळी केलेल्या स्टंटचा एक किस्सा सांगितला. 'अंगारे'साठी अभिनेत्याने केलेला तो स्टंट सगळ्यात अवघड होता, असं त्यांच म्हणणं आहे. दरम्यान या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "तो स्टंट इतका अवघड होता की महेश भट्ट त्या सीनवेळी सेटवरुन गायब झाले होते. मला हा सीन पाहायचा नाही, याला मरायचं आहे का? असं ते म्हणाले. मग मी तो स्टंट ते सेटवर नसताना पूर्ण केला."
पुढे अभिनेत्याने सांगितलं की, " या सीनसाठी एका बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन मला उडी मारायची होती आणि मध्येच रस्ता होता. त्याच्या दुसऱ्या बाजूलाही एक बिल्डिंग होती. त्यासाठी या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन मला दुसऱ्या बाजूला असलेल्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर जायचं होतं. असा तो खतरनाक स्टंट होता. याच शूटदरम्यान, महेश भट सेटवरुन गायब झाले होते."
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल तर सध्या 'स्काय फोर्स' सिनेमामुळे त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. अक्षय कुमारसह 'स्काय फोर्स'मध्ये वीर पहारिया, सारा अली खान हे कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.