Ar Rahman And Saira Banu Divorce: गेल्या काही दिवसांपासून भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर ए. आर. रहमान आणि पत्नी सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ए. आर. रहमान यांनी खुद्द सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती. ही बातमी सर्वांनाच धक्कादायक होती. यानंतर ए. आर. रहमान यांच्याकडून घटस्फोटावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. कारण, ए. आर. रहमान हे वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलताना दिसतात. पण, आता इतक्या दिवसानंतर त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.
नुकतंच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियाचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याबद्दल सांगितलं. सायरा बानूपासून वेगळं होणं हे त्यांच्यासाठी फार भावनिक आणि वैयक्तिक बाब होती, जी सार्वजनिक झाली, असं त्यांनी सांगितलं. ए. आर. रहमान म्हणाले, "लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझी काळजी घेतात. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आपल्या सर्वांमध्ये काही खास गुण आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सुपरहिरो आहे आणि माझ्या चाहत्यांनी मला सुपरहिरो बनवलं आहे. म्हणूनच मी माझ्या आगामी टूरला 'Wonderment' असे नाव दिले आहे, कारण मला लोकांकडून इतके प्रेम आणि आशीर्वाद मिळतात हे एक आश्चर्य आहे".
दरम्यान, ए. आर. रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर नात्यातील भावनिक तणावामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सायरा यांच्या वकिलानं सांगितलं होता. ए. आर. रहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. १९९२ मध्ये 'रोजा' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रहमान यांच्याकडे आज कोटींचीसंपत्ती आहे. देश-विदेशात त्यांची अनेक आलिशान घरं असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.