अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. अक्षय सध्या त्यांच्या आगामी चित्रपटातील एका दृश्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ‘कन्नप्पा’ या तेलुगू पौराणिक चित्रपटात भगवान शंकराची भूमिका साकारताना, एका व्हिडिओमध्ये अक्षय टेलिप्रॉम्प्टरवरून संवाद वाचत आहे, असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अक्षयने टेलिप्रॉम्प्टरवरून वाचला संवाद?
या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एका सीनमध्ये संवाद बोलताना दिसतोय. मात्र त्यावेळी अक्षयच्या डोळ्यांची हालचाल, संवाद बोलताना चेहऱ्यावर दिसणारा ताण, आणि काही क्षण डावीकडे बघण्याची हालचाल, यावरून नेटकऱ्यांनी अंदाज बांधला की, तो स्क्रिप्ट टेलिप्रॉम्प्टरवरून वाचत होते. काहींनी हा व्हिडीओ झूम करुन अक्षयच्या पापण्यांमध्ये टेलिप्रॉम्प्टरचं प्रतिबिंब दिसतंय, असाही आरोप केलाय.
ही गोष्ट लक्षात येताच, अनेकांनी अक्षय कुमारवर टीका केली. काहींनी त्यांना 'टेलिप्रॉम्प्टर कुमार' असे म्हणत ट्रोल केलं, तर काहींनी त्याच्या अभिनयावर आणि तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "एवढा मोठा कलाकार असूनही संवाद पाठ न करता वाचावं लागतं, हे निराशाजनक आहे," अशा शब्दात अनेकांनी अक्षयला नावं ठेवली. दरम्यान, काही चाहत्यांनी अक्षय कुमारची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला. "अक्षय कुमार वर्षभरात अनेक चित्रपट करतो, त्यामुळे काही वेळा अशा तांत्रिक साधनांचा वापर करणे गरजेचे ठरते," असा युक्तिवाद त्यांनी केला.
यापूर्वीही ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रचारादरम्यान अक्षय कुमार टेलिप्रॉम्प्टर वापरत असल्याची चर्चा झाली होती. मात्र, त्यावर अक्षयने कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण दिले नव्हते. ‘कन्नप्पा’ हा एक भव्य पौराणिक चित्रपट असून, त्यात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत झळकत आहे. पण त्याचा हा व्हिडिओ पाहून, आता सोशल मीडियावर अक्षयला टीकेचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणावर अक्षय कोणतं स्पष्टीकरण देणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.