गेल्या काही काळापासून एकामागोमाग एक फ्लॉप देणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारसाठी त्याचा मित्र अजय देवगण धावून आला आहे. अजय देवगणने नवीन सिनेमाची घोषणा केली आहे जो तो स्वत: दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमातअक्षय कुमारला मुख्य भूमिका देण्यात आली आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये अजय देवगणने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. अजय आणि अक्षयची जोडी आताच सिंघम अगेन मध्ये दिसली होती. आता ते दिग्दर्शक अभिनेत्याच्या रुपात समोर येणार आहेत.
हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिट २०२४ मध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgn) सहभागी झाले होते. या इव्हेंटमध्ये एका प्रेक्षकांना त्यांना प्रश्न विचारला की, 'दोघंही मुख्य भूमिकेत दिसतील असा सिनेमा कधी येणार? किंवा एक जण दिग्दर्शक आणि दुसरा अभिनेता असे असं कधी होणार का?' या प्रश्नावर अक्षय कुमारने अजयकडे इशारा केला. तर अजय देवगण हसत उत्तर देत म्हणाला, "ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही नंतर घोषणा करणार होतो, पण आता हे चांगलं व्यासपीठ आहे. आम्ही आधीपासूनच एका सिनेमावर काम करत आहोत ज्याचा मी दिग्दर्शक आहे तर अक्षय अभिनेता आहे. याबद्दल आम्ही नंतर सविस्तर सांगू. "
अजय देवगणने या सिनेमाबद्दल आणखी काही माहिती दिलेली नाही. तर दुसरीकडे अक्षय कुमारने 'हेरा फेरी ३' बद्दल अपडेट दिली. तो म्हणाला, "सध्या आम्ही वेलकम सिनेमावर काम करत आहे.सगळं सुरळीत झालं तर पुढील वर्षी हेरा फेरीचं शूटही सुरु होईल." अजय देवगण आणि अक्षय कुमारने याआधी 'खाकी','इंसान','सुहाग' या सिनेमांमध्ये काम केले आहे.