अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा आगामी सिनेमा 'हैवान'मध्ये मराठी अभिनेत्रींची एन्ट्री झाली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हैवान' सिनेमाचं शूट सुरु झालं आहे. कोची येथे सिनेमाची टीम पोहोचली आहे. या सिनेमामुळे अक्षय आणि सैफ १७ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. त्यामुळे चाहत्यांनाही उत्सुकता आहे. अक्षय कुमारने 'हैवान'च्या मुहुर्त शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तर आता सिनेमासाठी कोणत्या दोन अभिनेत्रींची निवड झाली आहे वाचा
अभिषेक बच्चनसोबत 'घुमर'सिनेमात दिसलेली अभिनेत्री संयमी खेर (Saiyami Kher) आता अक्षय-सैफसोबत झळकणार आहे. 'हैवान'सिनेमात तिची वर्णी लागली आहे. या सिनेमात काम करण्यासाठी ती देखील खूप उत्सुक असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे. ती म्हणाली, "हैवान च्या सेटवर आल्यावर एक वेगळाच आनंद होत आहे. मला आजही आठवतं लहानपणी मी थिएटरमध्ये जाऊन अक्षय सर आणि सैफ यांचे सिनेमे पाहिले आहेत. अक्षय सरांची अॅक्शन पाहून भारावले आहे आणि सैफच्या परफेक्ट कॉमिक टायमिंगवर हसले आहे. त्यांचे सिनेमे म्हणजे माझ्या बालपणाचा एक भागच होता आणि त्यांच्यामुळेच माझं हिंदी सिनेमावरचं प्रेम आणखी वाढत गेलं. आता माझे तेच लहानपणीचे हिरो आज माझे कोस्टार आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी त्यांना एकेकाळी प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं आहे आणि आज मी त्यांचाच सोबत स्क्रीन शेअर करणार आहे."
यासोबतच संयमीने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "प्रियन सर हे स्टोरी टेलर आहेत. त्यांनी आपल्याला भारतीय सिनेसृष्टीत अनेक आयकॉनिक सिनेमे दिले आहेत. आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणं माझ्यासाठी सुंदर अनुभूती असणार आहे. त्यांच्या सिनेमांमुळेच मी सिनेमाच्या प्रेमात पडले आणि आता त्यांच्या सिनेमाच्या सेटवर येणं म्हणजे आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे."
'हैवान'मध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकरचीही वर्णी लागली आहे. मात्र अद्याप तिच्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. श्रिया नुकतीच 'मंडला मर्डर्स'या सीरिजमध्ये दिसली. दोन मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्यांसोबत झळकणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.