बॉलिवूड अभिनेत्री ईशा शरवानी (Isha Sharvani) सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. अनेक वर्षांपासून ईशा सिनेसृष्टीतून गायब आहे. यामागची कारणं तिने सांगितली आहेत जी अतिशय धक्कादायक आहेत. 'लक बाय चान्स', 'किसना' सारख्या सिनेमांमध्ये ती दिसली होती. मात्र आता डान्स आणि योग मध्येच तिने आपलं करिअर केलं आहे. ईशाने तिच्या सुंदर दिसण्यामुळेच काम मिळत नव्हतं असा धक्कादायक खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ईशा शरवानी म्हणाली, "मी आतापर्यंत जे सिनेमे केले ते सर्व माझ्या सुंदर चेहऱ्यामुळे मिळाले होते. यातही अशाच भूमिका ज्यात हिरोच मला वाचवणार किंवा मला फक्त नाचायचं, गाणं म्हणायचं काम असणार. तुम्ही माझे चित्रपट पाहिले तर तुम्हाला जाणवेल की मला सुंदर चेहरा किंवा एखाद्या बालिश व्यक्तीचंच काम आहे. मला फक्त तेवढंच करायचं नव्हतं. करीब करीब सिंगल मध्ये मला इरफान सरांसोबत छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती. झलक दिखला जा नंतर मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. मला कोणीही कॉल करत नव्हतं. कारण इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी मुंबईत राहावं लागतं, नेटवर्क बनवावा लागतो. तेव्हा मी ठरवलं की मी पूर्णवेळ मुंबईत राहू शकत नाही."
ती पुढे म्हणाली, "मला तनुजा चंद्राने फोन केला होता. पहिला सिनेमा आपण असंच करुन जातो. नंतर पाच वर्षांनंतर विचार करतो की मी आजपर्यंत नक्की काय केलं. मी सिनेमा करताना काही सुचवलं तर दिग्दर्शक म्हणायचे तुला यासाठी साईन केलेलं नाही जे सांगितलंय ते कर. तेव्हा वाईट वाटायचं. स्त्रिया फक्त अंगप्रदर्शनासाठी बनल्या नाहीयेत. महिला खूप काही करुन शकतात. तेव्हाच मी ठरवलं की प्रभाव पाडता येईल असंच काहीतरी आयुष्यात करणार.
कास्टिंग काऊचचा आला अनुभव
ईशा म्हणाली, "एकदा एका बॉलिवूडच्या लीड हिरोने मला कॉम्प्रमाईज करायला सांगितलं होतं. काम हवं असेल तर माझ्यासोबत झोपावं लागेल अशी त्याने अट घातली होती. तेव्हा मला कळलं की मी ही तडजोड करुच शकत नाही. मी तिथून निसटले आणि नंतर फोन करुन नकार कळवला. कारण तिथेच नाही म्हटलं असतं आणि त्याने जबरदस्ती केली असती तर अशी मला भीती वाटली होती.