अभिनेते नाना पाटेकरांचा (Nana Patekar) नुकताच 'वनवास' सिनेमा रिलीज झाला. 'गदर' फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. यामध्ये त्यांचाच मुलगा 'गदर २'फेम उत्कर्ष शर्माने भूमिका साकारली आहे. नाना पाटेकर यांनी खास आमिर खानला (Aamir Khan) स्क्रीनिंगसाठी बोलवलं होतं. तर आता आमिर आणि नानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दोघांच्या साधेपणाचं कौतुक होत आहे.
आमिर खान आणि नाना यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. याचा व्हिडिओही लवकरच रिलीज होणार आहे. नाना ग्रे कुर्ता, पांढरा पायजमा अशा साध्या लूकमध्ये होते. तर आमिरही गुलाबी शर्ट आणि पांढरी धोती घालून आला होता. एका कट्ट्यावर दोघंही मांडी घालून गप्पा मारत बसले. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हात घालून पापाराझींसमोर पोज दिली. या व्हिडिओमध्ये दोघांचा साधेपणा पाहून चाहतेही खूश झालेत.
आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षात नाना आणि आमिर यांनी एकत्र सिनेमा केलेला नाही. 'वनवास' २० डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. नाना पाटेकरांनी यावेळी सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. अनिल कपूरनेही त्यांची मुलाखत घेतली. शिवाय केबीसी च्या सेटवरही नानांनी हजेरी लावली.