ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले डिहायड्रेशनमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. काही वेळातच त्यांना डिस्चार्जही मिळाला. ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो विभक्त होत असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. आता रहमान यांच्या तब्येतीवर सायरा बानो (Saira Banu) यांनी अपडेट दिलं आहे. 'मला पूर्व पत्नी असं बोलवू नका' अशी त्यांनी आश्चर्यकारक विनंती केली आहे.
सायरा बानो यांनी माध्यमांना एक व्हॉईस नोट पाठवली आहे. त्या म्हणतात, "नमस्कार, मी सायरा बानो. एक आर रहमान लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते. त्यांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली अशी मला माहिती मिळाली. देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, आमचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. आम्ही आजही पती पत्नी आहोत. माझ्या तब्येतीच्या कारणामुळे आम्ही वेगळे झालो. गेल्या दोन वर्षांपासून माझी तब्येत बरी नाही. म्हणून मला त्यांना जास्त स्ट्रेस द्यायचा नव्हता. त्यामुळे मी सर्व माध्यमांना विनंती करते की मला एक्स वाईफ असं म्हणू नका. तसंच रहमान यांनाही कोणतंही टेन्शन देऊ नका त्यांची काळजी घ्या."