ऑस्कर विजेता ए आर रहमानचा (A R Rahman) २९ वर्षांचा संसार मोडला आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. ए आर रहमानने आणि पत्नी सायरा बानो यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. दोघांमध्ये भावनिक तणाव निर्माण झाला आणि अनेक प्रयत्न करुनही तो दूर होऊ शकत नव्हता. म्हणून लग्नाला ३० वर्ष पूर्ण व्हायच्या आतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांच्या घटस्फोटावर त्यांच्या तीनही मुलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ए आर रहमान आणि सायरा बानो यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. खातिजा रहमान, रहीमा रहमान आणि ए आर अमीन अशी त्यांची नावं आहेत. खातिजा रहमानही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीतक्षेक्रात आली आहे. तिने वडिलांच्या एका अल्बममध्ये गाणंही गायलं. दरम्यान अमीन आणि खातिजाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले,"याक्षणी आम्हाला प्रायव्हसी द्यावी ही विनंती. तुम्ही समजून घेत आहात यासाठी आभारी आहे."
तर रहीमाने लिहिले, "तुम्ही या प्रकरणाबाबतीत जर पूर्ण प्रायव्हसी दिलीत तर बरं होईल. आभार. आमच्यासाठी प्रार्थना करा. "
ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी १९९५ साली लग्न केलं होतं. रहमानच्या आई आणि बहिणीनेच त्यांची भेट घडवून आणली होती. चेन्नई येथील एका आश्रमात त्यांची पहिली भेट झाली. यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्नही केले. ए आर रहमान आणि कुटुंब नेहमीच प्रायव्हसी जपत आले आहेत.