Preity Zinta: 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'कोई मिल गया' तसेच 'सलाम नमस्ते', 'वीर झारा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. प्रीती झिंटाने हिंदी सिनेसृष्टीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं. सध्या तिने अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेतली आहे. यशाच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये प्रीतीने जीन गुडइनफशी लग्न केलं आणि ती चित्रपटांमध्ये कमी दिसू लागली.
दरम्यान, अभिनेत्रीने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी आजही चाहत्यांच्या मनावर ती राज्य करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना तिच्याबद्दल खबरबात देत असते. अशातच नुकतीच अभिनेत्रीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रीती झिंटाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या आईसाठी प्रेमभाव व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिचे आईसोबतचे अनसीन फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवाय तिने या पोस्टवर लिहलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यामध्ये प्रीती झिंटाने लिहलंय, "जगभरातील छोट्या ट्रिप खूप व्यस्त आणि तणावपूर्ण वाटत असतात. परंतु तुझ्यासोबत फिरणं कंटाळवाणं वाटत नाही. या वीकेंडमुळे मला हे समजलं की खरी संपत्ती तिच असते जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असतं, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं तुमच्या आजूबाजूला असतात. मी स्वत: ला खूप नशीबवान समजते कारण तू जगातील बेस्ट आई आहेस. तू एक स्ट्रॉंग आणि गोड स्त्री आहेस."