Join us

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:14 IST

अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना विचारला.

मुंबई - अलीकडेच मराठी माणसाला नोकरी नाही अशा एका कंपनीच्या जाहिरातीवरून प्रचंड गदारोळ माजला. या जाहिरातीवरून मराठी-गुजराती वाद समोर येताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यातच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट करत मराठी उमेदवारालाच मत द्या असं आवाहन केले होते. त्यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना खुलं पत्र लिहिलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, आपण ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतु करिता होता कामा नये असं त्यांनी म्हटलं. 

चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहिलेलं पत्र वाचा जसंच्या तसं....

मा.रेणुकाताई शहाणे, 

जय महाराष्ट्र, 

आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा,परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे.भारतीय  विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. 

आपण ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या अवाहनाची टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छीते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्व:त खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. 

मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतु करिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. 

आपणास एक प्रश्न विचारते की  कोविडमधे पिपिई किट्स,बॉडी बॅग्स,मास्क,औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का?

चित्रा किशोर वाघ

टॅग्स :चित्रा वाघरेणुका शहाणेभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४