Join us

ज्याची घरात चर्चा त्याचा नंबर वरचा! दुसऱ्या आठवड्यात हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:28 IST

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील दुसऱ्या आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य झालं असून हे सदस्य नॉमिनेट झाल्याची चर्चा आहे (bigg boss marathi 5)

 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक भन्नाट खेळ आयोजित केले जात आहेत. हे खेळ खेळण्यासाठी सदस्यांमध्येही चुरस निर्माण होतेय. कालच बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसीची बुलेट ट्रेन हे कॅप्टनसी कार्य पार पाडलं. या कार्यात अंकिता प्रभू वालावलकर जी कोकण हार्टेड गर्ल नावानेही ओळखली जाते, तिला बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील पहिली कॅप्टन होण्याचा मान मिळाला. आज बिग बॉसमध्ये नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यात कोण सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार हे पाहायचं आहे.

बिग बॉसच्या घरात नवं नॉमिनेशन कार्य

'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी काय ट्विस्ट येईल हे कोणी सांगू शकत नाही. आता टास्कदरम्यान घरातील सदस्य धडपड करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अंकिता बिग बॉसने दिलेला आदेश वाचत म्हणतेय,"या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. आपणा सर्वांना चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे. त्यानंतर घरातील सदस्य पॅडी, सूरज, योगिता, निक्की, घन:श्याम ही नावे घेताना दिसून येत आहेत. तर वर्षाताई म्हणत आहेत,"माझ्या निर्णयाशी मी ठाम आहे". त्यानंतर अंकिता पुढे वाचते,"परंतु इथेच येतो माझा आवडता ट्विस्ट". आता बिग बॉस या नॉमिनेशन कार्यात काय ट्विस्ट आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

कोण होणार या आठवड्यात नॉमिनेट?

अशाप्रकारे आजचा नॉमिनेशनचा खेळ खूपच उत्साहवर्धक आणि मनोरंजक असणार आहे. प्रोमोत जे दिसतंय त्याप्रमाणे पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निक्की तांबोळी, घनःश्याम दरोडे ही नावं समोर येत आहेत. आता हेच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होणार की आणखी वेगळे सदस्य हे पाहणं उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, हे काहीच दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुखअंकिता प्रभू वालावलकरवर्षा उसगांवकर