Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझा बच्चा, दिलाची राणी...; लोकांनी खिल्ली उडवली पण त्याने जिद्द नाही सोडली, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:23 IST

सूरज चव्हाणची हटके लव्हस्टोरी, 'झापुक झुपूक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

बिग बॉस मराठी ५चा विनर आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'झापुक झुपूक'च्या ट्रेलरच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर शुक्रवारी(११ एप्रिल) सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलर पाहून चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

'झापुक झुपूक' सिनेमातून सोशल मीडिया स्टार असलेल्या सूरज चव्हाणचा आयुष्यातील संघर्ष दाखविण्यात येणार आहे. अॅक्शन, ड्रामा आणि इमोशनने भरलेला असा 'झापुक झुपूक' सिनेमाचा २.४० मिनिटांचा ट्रेलर आहे. यामध्ये सुरुवातीला "अरे कोण आहे हा? कुठून आणलंय याला?" असं म्हणत लोक त्याची खिल्ली उडवत असल्याचं दिसत आहे. लोकांनी वेळोवेळी त्याची फसवणूक केल्याचंही ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्याबरोबरच सूरजच्या प्रेमकहाणीची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेमात गोलीगत धोका मिळालेल्या सूरजचा सोशल मीडिया स्टार होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक या ट्रेलरमधून दाखविण्यात आली आहे. 

‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेगवेगळ्या भावनांचा मिश्रण या सिनेमात पहायला मिळणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" सिनेमाचा मजेशीर ट्रेलर नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आणि आता प्रेक्षक सिनेमाच्या रिलीझ ची आतुरतेने वाट पाहत आहे. "झापुक झुपूक" हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :केदार शिंदेसिनेमाबिग बॉस मराठीटिव्ही कलाकार