Allu Arjun Pushpa 2 : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी 'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुन त्याच्या चाहत्यांना भेटायला अचानक आला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी लोकांची एवढी गर्दी झाली की, चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरच्या व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?अल्लू अर्जुन त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला, तेव्हा तिथे उपस्थित असलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी इतका गोंधळ घातला की, चेंगराचेंगरी झाली. यावेळी दिलसुखनगर येथे राहणाऱ्या रेवती (39) आपल्या पती आणि दोन लहान मुलांसह सिनेमा पाहण्यासाठी आल्या होत्या. अल्लू तिथे येताच अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी चेंगराचेंगरीत रेवती यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळथाच पोलिसांनी तात्काळ रेवती आणि त्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून रेवतीला मृत घोषित केले. तर, त्यांच्या मुलाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्याला KIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे.