Allu Arjun News: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील एक चित्रपटगृहात पुष्पा २ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरी झाली होती. यात एका महिलेचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या अनुषंगाने मंगळवारी (२४ डिसेंबर) अल्लू अर्जूनची हैदराबाद पोलिसांनी चौकशी केली. तब्बल चार तास चौकशी चालली.
अल्लू अर्जूनसोबत कोण कोण होतं?
पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जून चौकशीला हजर राहण्यासाठी आधीच समन्स बजावले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी तो चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याच्यासोबत वडील अल्लू अरविंद आणि वकील होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली चौकशी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुरू होती.
पोलिसांनी कोणते प्रश्न विचारले?
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या सूत्रांनुसार अल्लू अर्जून चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल माहिती विचारण्यात आली.
प्रीमिअरला येण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, हे तुम्हाला माहिती होतं का?
पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना स्पेशल स्क्रीनिंगला येण्याचा निर्णय कोणी घेतला?
बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दलची माहिती पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला दिली होती का?
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याचे तुम्हाला कधी कळले?
या प्रश्नांसह पोलिसांनी चौकशीवेळी अल्लू अर्जूनला बाहेर चाहत्यांशी बोलण्याबद्दल परवानगी दिली गेली होती का? याबद्दल विचारणा केली.
पोलिसांचे म्हणणे काय आहे?
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेव्हा चित्रपटगृहात धावपळ सुरू झाली, तेव्हा अल्लू अर्जूनच्या बाऊन्सर्संनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही ढकलले, असा आरोप आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत असं घडलं असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.