अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट लिशालिनी कनरन (lishalliny Kanaran) हिने खळबळजनक खुलासा केला आहे. एका मंदिरात पुजाऱ्याकडूनच तिची छेड काढल्याचा दावा तिने केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने संपूर्ण घटना सांगितली. या घटनेमुळे तिला धक्का बसला आहे. याप्रकरणी तिने पोलिसातही तक्रार केली आहे. लिशालीनीने हा प्रकार समोर आणल्यानंतर पुजारी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.
लिशालिनीसोबत नक्की घडलं काय?
लिशालिनी कनरनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, "खूप कठीण आहे. मला हे सांगतानाही फार अवघड जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मी शांत होते. जे झालं ते उघडपणे बोलण्यासाठी मी धैर्य एकवटलं आहे. आजपर्यंत आयुष्यात मी कधी फार धार्मिक नव्हते. प्रार्थना कशी करायची असते हेही मला माहित नव्हतं. पण नुकतंच मी धार्मिक मार्गाकडे वळले. काही आठवड्यांपासून मी मंदिरात जात होते. हळूहळू गोष्टी शिकत होते. २१ जून रोजी माझी आई भारतात होती. म्हणून मी इथे मलेशियात एकटीच मंदिरात गेले. तिथले पुजारी मला मार्गदर्शन करायचे. एक दिवस त्या पुजाऱ्याने मला सांगितलं की त्यांच्याजवळ माझ्यासाठी पवित्र तीर्थ आणि एक धागा आहे. त्यांनी ते घेण्यासाठी मला बोलवलं. शनिवारी मी मंदिरात गेले. लोकांची गर्दी होती. त्यांनी मला थांबायला सांगितलं. मी तासभर थांबले."
"नंतर त्यांनी मला त्यांच्या मागे यायला सांगितलं. मला थोडं विचित्र वाटलं. त्यांच्या आतल्या केबिनमध्ये त्यांनी मला बसायला सांगितलं आणि ते उभे राहिले. त्यांनी तीर्थात काहीतरी घातलं. हे भारतातून आलं आहे असं ते म्हणाले. कोणाही व्यक्तीला मी हे देत नाही असंही म्हणाले. ते सतत माझ्या चेहऱ्यावर ते पाणी शिंपडत होते. मला नीट दिसत नव्हतं. त्यांनी मला माझा ड्रेस वर करायला सांगितलं. मी नकार दिला. त्याला राग आला. माझा हात धरुधरुन ते काहीतरी पुटपुटत होते. अचानक त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला. मला घाणेरडा स्पर्श केला. मला त्या क्षणी काहीच सुधरलं नाही. मला खरंच कळलं नाही की त्या क्षणी काय घडलं. मी इतर ठिकाणी किती वेळा एकटी गेले आहे. पण कुठेही मला असा वाईट अनुभव आला नव्हता. एक अशी जागा तिथे मला शांतता मिळेल असं वाटलं तर तिथे असं घडावं? मी प्रचंड धक्क्यात आहे."