१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावर झालेला एअर इंडियाचा अपघात भीषण होता. विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी वाचला. त्यानंतर एअर इंडिया लोकांच्या निशाण्यावर आली. अनेकांनी नंतर एअर इंडियामध्ये काय काय बिघाड होता याचे आपापले अनुभव सोशल मीडियावर सांगितले. तर काही सेलिब्रिटींनी एअर इंडियातून प्रवास करत त्यांना पाठिंबा दिला. नुकतंच एका टीव्ही अभिनेत्याने एअर इंडियातून प्रवास केला. त्याआधी त्याने व्हिडिओ शेअर करत 'इच्छापत्र' बनवून ठेवलं आहे म्हटलं.
टीव्ही मालिका तसंच बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसलेले अभिनेते कंवलजीत सिंह (Kanwaljit Singh) यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ते विमानतळावर बसले आहेत. ते म्हणतात, 'कोलंबोसाठी एअर इंडियातून उड्डाण घेणार आहे...इच्छापत्र बनवलं आहे.'
त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, "सर देव तुमचं भलं करो, पण अशा पद्धतीने एअरलाईनसाठी वाईट उद्गार काढू नका','तुम्हाला वकिलाची गरज आहे का?','तुमचा प्रवास सुखकर होवो','असं म्हणू नका, सकारात्मक राहा'.
कंवलजीत यांना शेवटचं अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमा पाहिलं गेलं. तसंच ते २०२३ साली 'मिसेस' सिनेमातही दिसले. १९८५ पासून ते मालिकांमध्ये काम करत आहेत. तर त्याआधीपासून ते हिंदी सिनेमांमध्ये झळकत आहेत.