Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा विभागाकडून ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा; उदय सामंतांच्या हस्ते लोगो लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:36 IST

मराठी मनोरंजनासाठी आणि भाषेच्या गौरवासाठी नवा अध्याय सुरू

महायुती सरकारच्या अथक प्रयत्नांना दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ यश मिळाल्यामुळे आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा प्राप्त झाला. या गौरवाच्या प्रेरणेतून, १ मे २०२५ रोजी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर येथे ‘राजभाषा मराठी दिन विशेष कार्यक्रम’ पार पडला. या कार्यक्रमात मा. मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत‘अभिजात मराठी’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोगो आणि घोषणा करण्यात आली.

AI आणि ग्लोबल कंटेंटच्या युगातही आपली मायबोली अभिमानाने उभी राहावी — यासाठी सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचा संकल्प केला आहे. सुमारे२० कोटी मराठी भाषिक प्रेक्षकांना एकत्र जोडण्यासाठी ‘अभिजात मराठी’ हे व्यासपीठ उभं राहत आहे. सध्या अनेक मराठी कलाकृतींना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी प्राधान्य दिलं जातं. ‘अभिजात मराठी’ हे त्यावर एक सशक्त आणि हक्काचं उत्तर ठरणार आहे. या ओटीटीचा सॉफ्ट लॉन्च जुलै २०२५ मध्ये होणार असून, तो १,००० निवडक प्रेक्षकांसाठी खास प्रिव्ह्यू स्वरूपात असेल. त्यानंतर, ऑक्टोबर २०२५ मध्ये मराठी भाषा आठवड्याच्या निमित्ताने या प्लॅटफॉर्मचा अधिकृत भव्य लॉन्च करण्यात येणार आहे.यावर दर्जेदार मराठी चित्रपट, वेबसीरिज आणि लघुपटांचा समृद्ध संग्रह प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त, इतर भारतीय भाषांतील निवडक चित्रपट मराठीत डब करून सादर करण्यात येणार आहेत, जेणेकरून भाषेची अडचण न वाटता सर्वांना दर्जेदार आशयाचा आनंद घेता येईल. त

मंत्री डॉ. उदय सामंत, आपल्या भाषणात म्हणाले ,“मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ही आता काळाची आणि भाषेची गरज बनली आहे.मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार — हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. आज मोबाइल हातात आल्यावर आपण दररोज १-२ चित्रपट हेडफोन लावून पाहतो.जर 'अभिजात मराठी' सारखा मराठीचा स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या हातात असेल, तर त्यातून मराठी भाषेचं संवर्धन, प्रचार आणि उत्तम साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतं. म्हणूनच हे व्यासपीठ अत्यावश्यक आणि अत्यंत काळानुरूप आहे.”

'अभिजात मराठी' चे संस्थापक केदार जोशी ह्यांनी सांगितले ,"अभिजात मराठी’ केवळ एक ओटीटी प्लॅटफॉर्म नाही, ती आपल्या भाषेची, आपल्या अस्मितेची, आणि आपल्या संस्कृतीची डिजिटल चळवळ आहे. ही भाषा जगायची आहे, टिकवायची आहे — म्हणून हे व्यासपीठ आम्ही निर्माण करतोय !” सर्व प्रकारच्या मराठी कंटेंटसाठी खुले आवाहन: ‘अभिजात मराठी’ या व्यासपीठावर प्रसारित होण्यासाठी आपल्या दर्जेदार मराठी कलाकृतींचं स्वागत करण्यात येत आहे. हे व्यासपीठ प्रामुख्याने चित्रपट, वेबसीरिज आणि लघुपट यांसारख्या विविध प्रकारच्या कंटेंटसाठी खुले असून, नवोदित आणि अनुभवी निर्मात्यांना एक नवी संधी देण्यासाठी तयार आहे.

कंटेंट पाठवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करू शकता ✉️ Email: content@abhijatmarathiott.com(टीप: कृपया तुमचं संपूर्ण प्रोफाइल व कंटेंट लिंक्ससहित सबमिट करावं.)

टॅग्स :मराठी भाषा दिनउदय सामंतमराठी चित्रपट