Ganesh Festival 2019 : बदलता गणेशोत्सव आणि सामाजिक पर्यावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 10:28 IST2019-09-02T10:20:38+5:302019-09-02T10:28:38+5:30
गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले.

Ganesh Festival 2019 : बदलता गणेशोत्सव आणि सामाजिक पर्यावरण
यादव तरटे पाटील
अमरावती - गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. मात्र, या गणेशोत्सवाचे स्वरूप आणि त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलला आहे. काही अपवाद वगळता या उत्सवाच्या उपयुक्ततेकडे आपले सपशेल दुर्लक्ष झाले आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा शिरकाव होय. त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या समस्या म्हणजे एक वेगळेच आवाहन आपल्या समोर निर्माण झाले आहे. सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकॉल आणि विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर तसेच रासायनिक रंगाचा वापर, अतिरेकी गुलाल उधळण या सर्व प्रकारामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
ज्या भावनेतून गणेशोत्सवाची निर्मिती झाली त्याच समाजाचे आरोग्यही यातून धोक्यात येत आहे. आपल्या अतिशय महत्त्वाच्या मुख्य गरजा म्हणजे प्राणवायू, प्राणी आणि अन्न... आणि याच नेमक्या धोक्यात येत आहेत. गणेशोत्सवातून होणारे जल, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण यामुळे केवळ आपलेच नाही तर पृथ्वीचे आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती आपल्याला दिसतात. हे बघून कोण्याही गणेशभक्ताचे मन उद्विग्न झाल्याशिवाय राहणार नाही.
रासायनिक रंग अधिक भयंकर
रासायनिक रंगांनी मूर्ती रंगवल्या जातात हे अधिक भयंकर वास्तव आहे. जल, ध्वनि प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो आहे.
मूत्रसंस्थेचे कार्य, डोळ्यांचे विकार, कर्करोग तर अनेक त्वचेचे आजारदेखील यातून संभवतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाणी प्रदूषित होतेच. शिवाय मातीचा पोतही खराब होतो.
(लेखक दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत)